विकास हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा यासाठी त्याला सामाजिक न्यायाची जोड असली पाहिजे.
विकास हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा यासाठी त्याला सामाजिक न्यायाची जोड असली पाहिजे.
पुण्यातील शिक्षण पूर्ण करून गोविंदभाई १९३६ मध्ये औरंगाबादला परतले, ते थेट देशकार्य आणि समाजसेवेचे व्रत हाती घेऊनच. मराठवाड्यातील तरुणांना एकत्र करून देशकार्याने झपाटलेली कार्यकर्त्यांची फौज उभी करावी, या विचाराने त्यांनी प्रयत्न सुरू केले. औरंगाबादला आल्यानंतर त्यांनी आपले मित्र विठ्ठलदास आणि चंद्रगुप्त चौधरी यांच्याशी या विषयावर चर्चा सुरू केली. विठ्ठलदास हे मार्क्सवादी विचारांचे होते. गुजरातमध्ये असतानाच गोविंदभाईंची झालेली मार्क्सवादाशी ओळख, विठ्ठलदासांच्या सहवासात अधिकच दृढ झाली. गोविंदभाई, विठ्ठलदास, स. कृ. वैशंपायन, चंद्रगुप्त चौधरी आणि व्ही. डी. देशपांडे हे मित्र औरंगाबादच्या हनुमान टेकडीवर फिरायला जात असत. तेथे या मित्रांमध्ये मार्क्सवादावर तासन्तास सखोल चर्चा होत असे. मार्क्स आणि लेनिन यांच्या लिखाणावर विचारांची देवाणघेवाण होत असे.
गोविंदभाईंनी औरंगाबादमध्ये एक ‘स्टडी सर्कल’ स्थापन केले. त्यांच्या राहत्या घरातच ते मंडळाच्या बैठका घेत असत. बैठकांना येणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. बैठकीत मार्क्सवाद, समाजवाद, गांधीवाद अशा अनेक विषयांवर चर्चा होत. गोविंदभाई स्वतः आपले विचार मांडत आणि नंतर इतर तरुणांना त्यावर बोलण्यासाठी उद्युक्त करत. गोविंदभाईंच्या विचारांनी तरुण प्रभावित होत. गोविंदभाईंनी मुंबईचे बी. जी. (बाळासाहेब) खेर यांना व्याख्यान देण्यासाठी औरंगाबादला बोलावले होते. हळूहळू अशा प्रकारची मंडळे अंबाजोगाई, परतूर, सेलू, परभणी, उमरी, बीड आणि लातूर या गावांमध्येही सुरू झाली. संपूर्ण मराठवाड्यात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
गोविंदभाईंनी शहरात होणाऱ्या गणेशोत्सवांना चालना देण्यास सुरुवात केली. कार्यक्रमांतील मनोरंजनातून देशभक्तीचा आणि समाजसुधारणेचा संदेश ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू लागले. औरंगाबादमध्ये नाथषष्ठीचा कार्यक्रम होत असे. नाथषष्ठीच्या दिवशी तरुण मंडळी पालखी घेऊन एक दिंडी काढत. गोविंदभाईही या दिंडीत सामील होत आणि देशभक्त व समाजसेवकांच्या नावाचा जयजयकार करत. त्यामुळे दिंडीत उत्साहाचे वातावरण निर्माण होत असे. शहरातील अशा कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात गोविंदभाई देशभक्तीचे बीज रोवण्याचा प्रयत्न करत.
१९३६ मध्ये गोविंदभाईंना औरंगाबादमधील सरकारी हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली. विशेष म्हणजे, शिस्तभंगाची कारवाई झाल्यामुळे याच शाळेला त्यांनी रामराम ठोकला होता. ते शाळेत इंग्रजी आणि गणित हे दोन विषय शिकवू लागले. गोविंदभाईंच्या संवेदनशील पद्धतीने शिकवण्याच्या शैलीमुळे ते लवकरच विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक बनले. शाळेत शिकवत असताना, एकदा निजामाच्या सुनेच्या औरंगाबाद भेटीवेळी गोविंदभाई आणि इतरांवर ‘दस्तर’ हा पारंपरिक पोशाख घालण्याची सक्ती करण्यात आली. गुलामगिरी दर्शवणाऱ्या या पोशाखाविरोधात त्यांनी सहकाऱ्यांसह शिष्टमंडळ नेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि सर्वांना सूट मिळवून दिली. या घटनेमुळे सहकाऱ्यांचा आणि विद्यार्थ्यांचा त्यांच्यावरील विश्वास अधिकच दृढ झाला.
औरंगाबादमधील चेलीपुरा या भागात घडलेली एक घटना गोविंदभाईंबद्दल बरेच काही सांगून जाते. होळीच्या दिवशी एका मुसलमान व्यक्तीवर रंग उधळल्याने या भागात दंगा उसळला. कोणत्याही एका समाजाची बाजू न घेता गोविंदभाईंनी सामोपचाराने दंगा मिटवला. सरकारी अधिकाऱ्यांनीही गोविंदभाईं यांच्या या कृत्याची स्तुती केली. समाजातील सर्व घटकांबाबतचा समान आदर गोविंदभाईंनी दाखवून दिला.
गोविंदभाईंना मार्क्सवादाविषयी आस्था होती, पण गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि ग्रामस्वराज्य या मूल्यांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांच्या विचारसरणीत दोन्ही प्रवाहांचे सुंदर मिश्रण दिसून येत असे. त्यांच्या लेखनातून आणि भाषणातून शांतता, त्याग आणि संयम यांवर विश्वास असलेली वृत्ती जाणवून येत असे. गोविंदभाई कोणताही विचार अथवा सिद्धांत आंधळेपणाने स्वीकारत नसत. मार्क्सच्या उत्पादन-संबंधांवरील विश्लेषण त्यांना मान्य होते, मात्र ‘कष्टकरी वर्गाची हुकूमशाही’ त्यांना मान्य नव्हती. ते समतेवर आधारित लोकशाही व्यवस्था आवश्यक मानत. गोविंदभाईंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळोवेळी चर्चा करून एक समतावादी, विवेकी मार्ग स्वीकारला. गांधीजींच्या विचारांप्रती त्यांची निष्ठा होती. अहिंसा, सत्याग्रह, साधे जीवन, स्वयंपूर्ण समाज आणि साधनसंपत्तीचा समान वाटा या गांधीजींच्या तत्त्वांवर त्यांचा दृढ विश्वास होता. गांधीजींच्या ग्रामस्वराज्याच्या संकल्पनेने ते भारावून गेले होते.
गांधीजींच्या नेतृत्वाखाली इंग्रज राज्यात ज्या प्रकारची चळवळ सुरू झाली होती, तशीच चळवळ हैदराबाद संस्थानातही व्हावी, असा गोविंदभाईंचा मानस होता. याच विचाराने ते मराठवाड्यातील तरुणांना जागृत करण्याचा प्रयत्न करत होते. पण घरच्यांच्या कल्पना वेगळ्याच होत्या. शिक्षण पूर्ण करून त्यांनी वकिली करावी, संसार थाटावा — हे घरच्यांचे स्वप्न होते. पण गोविंदभाईंना समाजकार्यासाठी लोकांमध्ये वावरायचे होते. त्यामुळे त्यांनी कमी पगाराची शाळेतील नोकरी स्वीकारली. याच काळात त्यांच्या लग्नासाठीही प्रयत्न सुरू झाले. मात्र त्यांचा राजकीय कल लक्षात आल्यावर अनेक वधूपित्यांनी माघार घेणे पसंत केले.
अखेर गोविंदभाईंसाठी योग्य जोडीदार मिळाली ती मुरादाबादमधील पारीख कुटुंबातील डॉ. सत्यवती, उर्फ सत्याबेन. सत्याबेन यांचे वडील जयकृष्णदास पारीख, तर जमनाबाई त्यांच्या आई. जयकृष्णदास पारीख हे एक प्रतिष्ठित जमीनदार होते. सत्याबेनने आग्रा मेडिकल कॉलेजमधून डॉक्टरची पदवी घेतली होती. सत्याबेन यांचे मामा गोविंददास मेहता यांचा हैदराबादमध्ये फोटो स्टुडिओ होता. त्या निमित्ताने त्यांचा गोविंदभाईंशी परिचय झाला होता. औरंगाबादचे विठ्ठलदास चौधरी यांनीही हे लग्न जुळवण्यासाठी पुढाकार घेतला. शेवटी, १३ मे १९३७ रोजी गोविंदभाई आणि डॉ. सत्याबेन यांचा विवाह थाटात पार पडला आणि गोविंदभाईंचा संसार सुरू झाला.