विकास हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा यासाठी त्याला सामाजिक न्यायाची जोड असली पाहिजे.
विकास हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा यासाठी त्याला सामाजिक न्यायाची जोड असली पाहिजे.
औरंगाबाद, १२ सप्टेंबर १९४९
आदरणीय सरदारजी,
आपल्या दिनांक ३च्या पत्रासाठी मी आपला मनःपूर्वक आभारी आहे. उमरी बँक संदर्भातील प्रकरणावर हे पत्र मी आपणांस लिहीत आहे.
श्री. जनार्दनराव देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या मुद्द्यावरून मोठी खळबळ उडवली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी ही त्यांची कदाचित शेवटची धडपड असावी. त्यांच्या दृष्टीने निवडणूक अधिकाधिक कठीण होत चालली आहे. हे असे घडेल, अशी शक्यता मी आपल्याला प्रत्यक्ष भेटीत व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांचे हे वागणे विशेष आश्चर्यकारक वाटत नाही.
स्वामीजींनी या विषयाबाबत आपल्याशी चर्चा करून या निधीचा ट्रस्ट स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांना जे योग्य वाटेल ते त्यांनी करावे असा सल्ला तुम्ही दिल्याचे कळाले. जेव्हा मी आपल्याला भेटलो होतो, तेव्हा या निधीचा हिशोब जाहीर करण्यासाठी आपली परवानगी मागितली होती. परंतु त्या वेळी, “थोडा वेळ थांबा आणि शक्य असल्यास, दरम्यान विरोधी गटातील एक-दोघांचा विश्वास संपादन करा,” असा सल्ला आपण दिला होता. परंतु आजपर्यंत तसे का करता आले नाही, याचे कारण स्पष्ट करण्यापूर्वी, मला काही बाबी आपल्यासमोर मांडावयाच्या आहेत...
उमरी बँकेचे प्रकरण हे निजामशाहीविरुद्ध जनतेने चालवलेल्या लढ्याचा एक भाग होते. ही घटना अनेक लोकांच्या सहभागातून साकारली गेली होती. ती ‘कृती समिती’ किंवा तिच्या प्रांतीय शाखांनी नियोजित केलेली नव्हती. मात्र, आमचे काही कार्यकर्ते या घटनेत सहभागी होते. त्यांनी त्या गावातील इतर काही नागरिकांसह ही योजना आखली आणि ती यशस्वीरित्या अमलात आणली. कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ही बाब आम्हाला सांगितली. त्यावेळी आम्ही त्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला. मिळालेली रक्कम संघर्ष तीव्र करण्यासाठीच वापरण्यात यावी, वैयक्तिक कारणासाठी त्यातील एकही पैसा खर्च होऊ नये, असा सल्ला आम्ही त्यांना दिला. अर्थातच, सर्वांनी या बाबतीत एकमत दर्शवले. ही योजना त्यांनी तत्कालीन सरकारविरुद्ध केलेल्या हल्ल्याच्या स्वरूपात आखली होती—स्वतःच्या स्वार्थासाठी दरोडा टाकण्यासाठी नव्हे.
तेव्हापासून ही रक्कम केवळ संघर्षाच्या कार्यासाठीच वापरण्यात आली आहे. निजामविरोधी संघर्षात आवश्यक साधनसामग्री खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात आला. पोलिस कारवाईनंतर यातील बराचसा माल भारत सरकारकडे परत करण्यात आला. काही सामग्री नष्ट झाली, तर काही फेकून देण्यात आली. हा संघर्ष चौदा महिन्यांहून अधिक काळ सुरू राहिल्यामुळे मराठवाड्यातील अनेक केंद्रांमध्ये निधीची टंचाई भासू लागली आणि त्यांना या निधीतून मदत करणे आवश्यक ठरले. या सर्व कामांसाठी, अनियमित विनिमय दराने ही रक्कम एल.जी. चलनात रूपांतरित करण्यात आली. अडचणींवर मात करून आणि धोका पत्करून गरजेनुसार यातून कार्यकर्त्यांना वेळोवेळी निधी पुरवण्यात आला. पोलीस कारवाईनंतर स्वामीजींची जेव्हा सुटका झाली, तेव्हा त्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली. उरलेल्या रकमेबाबतही त्यांना कल्पना देण्यात आली. तसेच या निधीच्या पुढील वापराबाबत इतर कार्यकर्त्यांचे विचार काय आहेत, याची माहितीही त्यांना देण्यात आली.
ही संपूर्ण बाब सहानुभूतीपूर्वक पाहणे आवश्यक आहे. त्या हल्ल्यामागील धैर्य व शौर्याचे कौतुक करत त्यामागील प्रेरणाही समजून घेणे महत्त्वाचे आहे. असे केल्यास हे प्रकरण अत्यंत प्रामाणिक आणि पारदर्शक वाटेल. भारताच्या ब्रिटिशविरोधी लढ्यात अशा अनेक घटना घडलेल्या दिसतात. त्यांच्याशी तुलना केल्यास उमरी बँकेचे प्रकरणही त्याच पातळीवर समजून घेता येईल. मात्र, जे या घटनांकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात, त्यांच्यासाठी हे प्रकरण एक गंभीर गुन्हा, मोठा घोटाळा आणि निधीचा अपव्यय वाटतो.
अशा व्यक्तींचा या घटनेविषयी असलेला पूर्वग्रह पाहून, आपण आजपर्यंत त्यांना याविषयी समजावून सांगू शकलो नाही. अर्थात, लढ्याच्या काळात किंवा त्यानंतरही कोणत्याही केंद्राने आपले हिशेब सार्वजनिक केलेले नाहीत. जवळपास सर्व केंद्रे स्वतंत्रपणे कार्यरत होती. तरीही आपणांस आम्ही खात्यातील अनेक तपशील दिले आहेत. आपण हे संपूर्ण प्रकरण संघर्षाचा एक भाग म्हणून आणि तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भानेच पाहाल, अशी आम्हाला खात्री आहे. परंतु हे लोक सातत्याने त्या संघर्षाला आणि सीमावर्ती भागातील कार्यांना लुटारूंचे कृत्य ठरवत आहेत. आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर समाजविघातक असल्याचे आरोप लावले जात आहेत. राज्यातील जवळजवळ प्रत्येक घडामोडीसाठी स्वामीजींवरच जबाबदारी टाकली जात आहे. अशा लोकांवर विश्वास ठेवून त्यांच्यासमोर ही बाब मांडणे अत्यंत कठीण होत आहे.
असत्य प्रचारात त्यांनी इतकी टोकाची भूमिका घेतली की, आमची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील होण्याची इच्छा नव्हती, असे त्यांनी सांगितले. त्यांनी असेही म्हटले की अंतरिम सरकार यशस्वी झाले नाही ते आमच्यामुळे. पंडितजी आणि सरदारजी यांना आमच्यावर विश्वास नाही आणि जनतेलाही आमच्यावर विश्वास नाही. त्यांच्या या आरोपांमुळे आणि संघर्षाबाबत त्यांनी घेतलेल्या निंदात्मक भूमिकेमुळे त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवावा असे आम्हाला वाटत नाही.
उमरी बँकेच्या रकमेबाबत त्यांनी अनेक गैरसमज पसरवले आहेत. त्यात हेही सांगितले जाते की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना निवडणूक प्रचारासाठी हजारो रुपयांची मदत केली. याबाबतीत मी सांगू इच्छितो की, आपल्याला हिशेब दिल्यानंतर आम्ही त्या रकमेतील एक पैसाही वापरलेला नाही. आम्ही त्या रकमेचा उपयोग विश्वस्त निधीसारखा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ती रक्कम तशीच राखून ठेवलेली आहे. आम्ही या निधीतून इतर कामांसाठी पैसे खर्च करत आहोत याचा त्यांनी पुरावा द्यावा असे माझे त्यांना आव्हान आहे. निवडणुकीसाठी आम्ही खर्च नक्कीच करत आहोत, परंतु तो आमच्याकडील इतर लहानसहान स्त्रोतांमधून केला जात आहे.
आम्ही आमच्या प्रकाशनाद्वारे प्रचार करत आहोत असा त्यांचा आरोप असेल तर ते सत्य आहे. अर्थात, याचे कारण म्हणजे हैदराबादमधील जवळजवळ संपूर्ण वृत्तपत्रव्यवस्था त्यांनी आपल्या ताब्यात घेतलेली आहे. आमची बाजू मांडण्यासाठी पर्यायी मार्ग शोधणे आम्हाला भाग होते. ज्या क्षणी आम्हाला वाटेल की जनतेचा आमच्यावर विश्वास राहिलेला नाही, त्या क्षणी आम्ही स्वतःहून बाजूला होऊ. आमच्याकडे ना पैसा आहे, ना उच्चभ्रूंचे पाठबळ. जनतेचा विश्वास हेच आमचे एकमेव भांडवल आहे. उमरी बँक सारखी प्रकरणे आमच्या आयुष्याच्या कार्याचा आरंभ किंवा शेवट ठरणार नाहीत. राष्ट्र उभारणीसाठी आवश्यक असलेले लोककार्य करण्यासाठी आम्ही आणि आमचे कार्यकर्ते पूर्णतः बांधील आहोत.
वस्तुस्थिती आणि तथ्यांच्या दृष्टिकोनातून पाहता, हे संपूर्ण प्रकरण सहानुभूतीने त्यामधील शौर्य व प्रामाणिकतेच्या मान्यतेसह पाहिले गेले पाहिजे, असे आम्हाला वाटते. उरलेली रक्कम कशा प्रकारे वापरायची, याचा निर्णय घेताना या घटनेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या सूचनांचा आदर झाला पाहिजे. तसेच, ही घटना कृती समितीच्या संदर्भात कशी पाहावी हेही ठरवले पाहिजे.
सरदारजी, आम्ही आपल्याला सर्व काही प्रामाणिकपणे सांगितले आहे. आपल्याला आणखी काही माहिती हवी असल्यास, ती देण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. सध्या माझी प्रकृती ठीक नाही, त्यामुळे मी औरंगाबादला परत आलो आहे. तब्येत सुधारल्यावर आपली प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी येण्याची माझी मनापासून इच्छा आहे.
आपला,
जी. एम. श्रॉफ
सरदार पटेलांचे उत्तर
१२ सप्टेंबर १९४९ चे आपले पत्र मिळाले. त्याबद्दल धन्यवाद.
स्वामीजी जेव्हा डेहराडूनला आले होते, तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते की या प्रकरणात मी स्वतःला गुंतवून घेऊ इच्छित नाही. ही पूर्णपणे त्यांची आणि हैदराबादमधील काँग्रेस संघटनेची अंतर्गत बाब आहे.
आपली तब्येत ठीक नसल्याचे ऐकून वाईट वाटले. आता आपण बरे असाल, अशी आशा आहे.
आपला,
आपला स्नेहांकित,
वल्लभभाई पटेल