विकास हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा यासाठी त्याला सामाजिक न्यायाची जोड असली पाहिजे.
विकास हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा यासाठी त्याला सामाजिक न्यायाची जोड असली पाहिजे.
हैदराबाद मुक्तिसंग्राम, मराठवाड्याचे संयुक्त महाराष्ट्रात विलीनीकरण आणि त्यानंतर मराठवाड्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारे गोविंददास मन्नुलाल श्रॉफ, म्हणजेच गोविंदभाई श्रॉफ, यांचा जन्म २४ जुलै १९११ रोजी त्यांच्या आजोळी विजापूर येथे झाला.
गोविंदभाईंचे वडील मन्नुलाल आणि आई रुक्मिणीबाई. श्रॉफ घराणे मूळचे गुजरातचे. औरंगजेब मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत आल्यानंतर व्यापाराच्या निमित्ताने अनेक गुजराती कुटुंबे महाराष्ट्रात स्थलांतरित झाली, त्यात श्रॉफ घराणेही होते. उपजीविकेसाठी हे घराणे औरंगाबादला (आताचे छत्रपती संभाजीनगर) आले आणि तेथेच स्थायिक झाले.
गोविंदभाईंचे आजोबा मुन्शीलाल औरंगाबाद शहरात सराफी व्यवसाय करत. मुन्शीलाल आणि त्यांची पत्नी मगनबाई यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये होती — मुलीचे नाव हरकुंवर आणि मुलाचे नाव मन्नुलाल. हरकुंवर विवाहानंतर वैजापूरला सासरी गेल्या; मात्र पतीच्या निधनानंतर त्या पुन्हा माहेरी, म्हणजेच मुन्शीलाल यांच्या घरी परत आल्या आणि तेथेच स्थायिक झाल्या. मुन्शीलाल यांचा मुलगा मन्नुलाल, म्हणजे गोविंदभाईंचे वडील, औरंगाबादमध्ये चलन विनिमयाचा व्यवसाय करत. त्यांचा विवाह कर्नाटकातील विजापूरचे श्री. विष्णुदासजी यांची कन्या रुक्मिणीबाई यांच्याशी झाला. श्रॉफ घराणे गर्भश्रीमंत नसले तरी खाऊन-पिऊन सुखी होते.
मन्नुलाल यांच्या वयाची पस्तिशी उलटली तरी त्यांना संतती झाली नव्हती. पुढे मन्नुलाल आणि रुक्मिणीबाईंना तीन अपत्ये झाली. सर्वांत मोठी कन्या कस्तुरीबाई, जिचा विवाह श्री. नरसीदासजी यांच्याशी झाला. मात्र नरसीदासजींचे निधन झाल्यानंतर त्या पुन्हा माहेरी परतल्या. कस्तुरीबाई सात वर्षांची असताना गोविंदचा जन्म झाला. त्यानंतर चार वर्षांनी त्यांना दुसरा मुलगा झाला, त्याचे नाव गोपालदास.
गोविंद नवसाने जन्मल्याची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. आपल्या भावाला पुत्र व्हावा म्हणून हरकुंवरने सावरखेड्याच्या स्वयंभू आणि जागृत नृसिंहाला नवस केला होता. नवसाच्या फलस्वरूप गोविंदचा जन्म झाला, असे सांगितले जाते. गोविंद जन्मल्यानंतर हरकुंवरने नवस फेडण्यासाठी घरापासून सावरखेड्याच्या नृसिंह मंदिरापर्यंत दंडवत घालत जाऊन नवस पूर्ण केला.
गोविंद आणि गोपाळ ही मुले उशिरा झाल्यामुळे त्यांचे लहानपणी खूप लाड झाले. परंतु गोविंद साडेचार वर्षांचा असताना, १९१६ साली मन्नुलाल यांचे निधन झाले. त्यावेळी गोपाळ केवळ सहा महिन्यांचा होता. मृत्यूसमयी मन्नुलाल यांचे वय फक्त ४३ वर्षे होते. त्यांच्या अकाली मृत्यूने श्रॉफ कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले.
घरात गोविंदची आजी मगनबाई होत्या, ज्यांना सगळे प्रेमाने ‘मगनजिया’ म्हणत. आत्या हरकुंवरभाई यांना ‘फई’ या नावाने हाक मारली जाई. गोविंद आणि गोपाळ यांचे संगोपन आई रुक्मिणीबाई, आजी मगनजिया आणि आत्या फई यांनी प्रेमाने व जबाबदारीने केले. मन्नुलाल यांच्या मृत्यूनंतर मगनजियांनी अर्थार्जनाची जबाबदारी उचलली, आणि तिघींनी मिळून मुलांवर चांगले संस्कार घडवले.
गोविंदचे प्राथमिक शिक्षण औरंगाबादच्या श्री. मोहंत यांच्या गुजराती शाळेत झाले. येथे मुख्यतः गुजराती भाषा आणि व्यापारी गणित शिकवले जात असे. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी गोविंदचा दाखला औरंगाबादमधील इंग्रजी माध्यमाच्या ‘मदरसे फोकानिया’ या सरकारी शाळेत घेण्यात आला.
या शाळेत गोविंदचा परिचय शिक्षक श्री. वि. गो. कर्वे गुरूजींशी झाला. कर्वे गुरूजी राष्ट्रीय दृष्टिकोन असलेले तत्त्वनिष्ठ शिक्षक होते. ते केवळ अध्यापनातच उत्कृष्ट नव्हते, तर विविध सामाजिक कार्यातही सक्रिय असत. विद्यार्थ्यांमध्ये स्वाभिमान आणि राष्ट्रीय भावना जागवणे, मातृभाषेचा अभिमान बाळगणे आणि उर्दूऐवजी स्वभाषेचा आग्रह धरणे हे त्यांचे ठळक गुण होते.
शाळेत कर्वे गुरूजी संस्कृत शिकवत. त्यांच्या प्रभावामुळेच गोविंदला संस्कृत अध्ययनाची गोडी लागली, शालेय शिक्षणात रस निर्माण झाला, तसेच सार्वजनिक कार्य आणि देशभक्तीची प्रेरणाही मिळाली.
१९२५ साली औरंगाबादमध्ये गणेश संघाची स्थापना झाली, ज्यात कर्वे गुरुजींचा पुढाकार होता. तत्कालीन निजामाच्या राजवटीत अशा मंडळाची स्थापना केवळ धार्मिकच नव्हे, तर राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाची होती. कर्वे गुरुजींच्या प्रेरणेने गोविंद संघाच्या कामात सहभागी झाला. या कामातूनच त्याच्या मनात शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली.
गोविंद सुमारे चौदा–पंधरा वर्षांचा असताना कर्वे गुरुजींनी त्याला स्वामी विवेकानंदांचे चरित्र वाचायला दिले. विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा गोविंदवर खोल प्रभाव पडला. याच काळात त्याला पुस्तके वाचण्याची गोडी लागली. त्याने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ आणि जोसेफ मॅझिनीचे चरित्र वाचले. तसेच, महात्मा गांधींचे यंग इंडिया हे वृत्तपत्र तो नियमित वाचू लागला.
या वाचनामुळे मॅट्रिकच्या वर्गात असतानाच गोविंदच्या मनात स्वातंत्र्यप्रेम जागृत झाले. शाळेतील एका शिक्षकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला म्हणून त्याने वर्ग सोडून दिला. निजामाच्या एकाधिकारशाहीमुळे समाजावर ओढवलेल्या गुलामगिरीची आणि सरंजामशाहीच्या शोषणाची जाणीव त्याला झाली.
गोविंदला केवळ बौद्धिक प्रबोधनातच नव्हे, तर शारीरिक सुदृढतेतही रस होता. औरंगाबादमधील त्या काळच्या प्रसिद्ध समर्थ व्यायामशाळा या आखाड्यात तो नियमित व्यायाम करू लागला. तेथे त्याची अनेक तरुणांशी ओळख झाली आणि त्यांच्या मनात तो देशभक्तीची भावना जागवू लागला. लवकरच त्या तरुणांचा विश्वास व नेतृत्व गोविंदकडे आले.
गोविंदने औरंगाबादमधील काही उत्साही तरुणांना एकत्र करून स्वतःचे एक गणेश मंडळ स्थापन केले. या मंडळाच्या माध्यमातून समाजात स्वातंत्र्याच्या विचारांना चालना देणे, हाच त्याचा उद्देश होता. मंडळाच्या उपक्रमांची चर्चा शाळेतील विद्यार्थ्यांमध्येही होऊ लागली. ही बातमी एका विद्यार्थ्याने वर्गशिक्षकांना सांगितली, आणि त्यांनी ती मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचवली. मुख्याध्यापकांनी गोविंदला बोलावून, सरकारविरोधी कोणतीही कृती पुन्हा करू नये, अशी ताकीद दिली.
कर्वे गुरुजी संस्कृतप्रमाणेच इंग्रजी विषयही प्रभावीपणे शिकवत. मॅट्रिकच्या वर्षात गोविंदने इतर विद्यार्थ्यांना घेऊन मुख्याध्यापकांकडे जाऊन इंग्रजीचे अध्यापन कर्वे गुरुजींकडेच सोपवावे, अशी विनंती केली. मात्र मुख्याध्यापकांनी ही मागणी फेटाळून, उलट अशी मागणी का केली, याचा जाब विचारत गोविंदला शिक्षा ठोठावली — एक रुपया दंड आणि लेखी माफीनामा.
गोविंदने शिक्षा स्वीकारण्यास नकार दिला. मुख्याध्यापकांनी दंड माफ करून केवळ माफीनामा लिहिण्याचा प्रस्ताव दिला, तरीही गोविंदने त्यालाही नकार दिला. अखेर त्याने ती शाळा सोडून पुढील शिक्षणासाठी हैदराबादला जाण्याचा निर्णय घेतला.
गोविंदच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. घरचा आधार फक्त आई, आजी आणि आत्या या तिघी महिलाच होत्या. छोट्या-मोठ्या कामांतून त्या कसाबसा खर्च भागवत. अशा परिस्थितीत गोविंदला हैदराबादला शिकायला पाठवणे त्यांच्यासाठी फारच कठीण होते. पण नातवाच्या बुद्धिमत्तेवर आजी मगनजियांचा गाढ विश्वास होता. अडचणी असूनही गोविंदने शिकले पाहिजे, ही त्यांची जिद्द होती. म्हणूनच त्यांनी निर्धाराने त्याला हैदराबादला पाठवले.
शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मुख्याध्यापकांनी प्रतिकूल शेरा लिहिल्यामुळे गोविंदला हैदराबादमध्ये कुठे प्रवेश मिळेल का, याबद्दल शंका होती. तरीही तो चादरघाट इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापकांकडे गेला आणि घडलेली घटना स्पष्टपणे सांगितली. शाळेने त्याची प्रवेश परीक्षा घेतली, ज्यात त्याने उत्तम यश मिळवले. अखेर सप्टेंबर १९२७ मध्ये गोविंदला हैदराबादच्या या शाळेत प्रवेश मिळाला.
१९२८ मध्ये त्याने चादरघाट हायस्कूलमधून मॅट्रिक परीक्षा दिली आणि संपूर्ण हैदराबाद संस्थानात सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. गोविंदच्या शिक्षणातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता. या यशानंतर औरंगाबादेत त्याचा नागरी सत्कार झाला आणि नागरिकांच्या वतीने त्याला सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले.
गोविंदला त्या काळात अत्यंत मानाची समजली जाणारी गोखले शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीत दर महिन्याला ३० रुपये आणि वर्षातून एकदा पुस्तकांसाठी १०० रुपये दिले जात. ही शिष्यवृत्ती त्याला सलग चार वर्षांसाठी मंजूर झाली आणि पुढील शिक्षणासाठी मोठा आधार ठरली