विकास हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा यासाठी त्याला सामाजिक न्यायाची जोड असली पाहिजे.
विकास हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा यासाठी त्याला सामाजिक न्यायाची जोड असली पाहिजे.
१९११, २४ जुलै: गोविंददास मन्नुलाल श्रॉफ (गोविंदभाई श्रॉफ) यांचा जन्म विजापूर येथे आजोळी झाला.
१९१६: गोविंदभाईंच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी गोविंदभाई अवघे साडेचार वर्षांचे होते.
१९२५: औरंगाबादमध्ये कर्वे गुरुजींच्या पुढाकाराने ‘गणेश संघा’ची स्थापना झाली. गोविंदभाईंनी गणेश संघाचे काम सुरू केले.
१९२८: मॅट्रिकच्या वर्गात असताना गोविंदभाईंनी औरंगाबादमधील ‘मदरसे फोकानिया’ ही सरकारी शाळा सोडली व हैदराबाद येथील चादरघाट हायस्कूलमधून मॅट्रिक परीक्षेत संपूर्ण हैदराबाद संस्थानात प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यांना गोखले शिष्यवृत्ती मिळाली.
१९३०: गोविंदभाई हैदराबादमधील निजाम कॉलेजमधून इंटरमिजिएट (सायन्स) परीक्षा उत्तीर्ण झाले. महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनाला प्रतिसाद देत त्यांनी शिक्षण थांबवून स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्याचा निर्णय घेतला.
१९३१, ५ मार्च: गांधीजींनी गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला जाण्यापूर्वी सत्याग्रहाची चळवळ मागे घेतली. गोविंदभाईंनी आपले शिक्षण पुन्हा सुरू करण्याचे ठरवले.
१९३३: गोविंदभाईंनी कलकत्त्याच्या ‘सिटी कॉलेज’मधून गणित हा मुख्य विषय घेऊन बी.एस्सी. (ऑनर्स) पदवी संपादन केली.
१९३५: गोविंदभाईंनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून एम.एस्सी. (गणित) पदवी संपादन केली.
१९३६: गोविंदभाईंनी एल.एल.बी. पदवी संपादन केली. ते औरंगाबादला परतले आणि सरकारी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले.
१९३७: हैदराबाद संस्थानात असंतोषाला सुरुवात झाली.
१९३७, १३ मे: गोविंदभाई आणि डॉ. सत्यवती (सत्याबेन) यांचा विवाह थाटात पार पडला.
१९३७ (उन्हाळा): महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील परतूर येथे ‘महाराष्ट्र परिषद’ चे पहिले अधिवेशन झाले. यात गोविंदभाईंची स्वामी रामानंद तीर्थ यांच्याशी भेट झाली. ‘घटना समिती’ नेमण्यात आली, ज्यात गोविंदभाई सदस्य होते.
१९३८, १ जून: लातूर (उस्मानाबाद जिल्हा) येथे महाराष्ट्र परिषदेचे दुसरे अधिवेशन झाले. या अधिवेशनात परिषदेच्या ‘घटने’चा अंतिम मसुदा मंजूर झाला.
१९३८, २९ जून: हैदराबाद येथे ‘हैदराबाद स्टेट काँग्रेस’ची स्थापना करण्याचे निश्चित झाले.
१९३८, ७ ऑगस्ट: हंगामी समितीने हैदराबाद संस्थानात जबाबदार राज्यपद्धती निर्माण करणे हा उद्देश असलेले निवेदन जाहीर केले.
१९३८, ८ सप्टेंबर: निजाम सरकारने गॅझेटद्वारे ‘हैदराबाद स्टेट काँग्रेस’वर बंदी घातली.
१९३८, २४ ऑक्टोबर: गोविंदराव नानल यांच्या नेतृत्वात हैदराबादमध्ये सत्याग्रह झाला. गोविंदभाईंनी औरंगाबाद केंद्राचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली आणि सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. त्यांना अटकही झाली.
१९३८, २७ ऑक्टोबर: स्वामी रामानंद तीर्थ यांनी सत्याग्रहाच्या दुसऱ्या तुकडीचे नेतृत्व केले आणि त्यांना अटक झाली.
१९३८, नोव्हेंबर: गोविंदभाईंनी औरंगाबादमध्ये ‘वंदे मातरम्’ चळवळीला सुरुवात केली, जी नंतर संपूर्ण संस्थानात पसरली. या चळवळीमुळे १,२०० विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले.
१९३८, २४ डिसेंबर: गांधीजींच्या आदेशाने सत्याग्रहाची मोहीम तात्पुरती स्थगित केली.
१९३९, १२-१३ सप्टेंबर: कार्यकर्त्यांची एक बैठक मनमाड येथे झाली. या सभेत गोविंदराव नानल अध्यक्ष व स्वामी रामानंद तीर्थ सरचिटणीस म्हणून निवडले गेले. ‘विधायक कार्य समिती’ स्थापन करण्यात आली.
१९३९: गोविंदभाईंनी औरंगाबाद येथील सरस्वती भुवन शाळेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारली आणि शाळेसाठी नवीन इमारत उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला.
१९४०, डिसेंबर: गोविंदभाई, आ. कृ. वाघमारे आणि इतर काही आघाडीच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. त्यांना बावीस महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आणि बिदरच्या तुरुंगात पाठवण्यात आले.
१९४१: महाराष्ट्र परिषदेचे तिसरे अधिवेशन नांदेड जिल्ह्यातील उमरी गावात झाले. गोविंदभाई तुरुंगात असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत.
१९४२, २४ ऑक्टोबर: गोविंदभाईंची तुरुंगातून सुटका झाली.
१९४३: गोविंदभाई आणि आ. कृ. वाघमारे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र परिषदेचे चौथे अधिवेशन औरंगाबाद येथे भरवण्यात आले. बॅरिस्टर श्रीधर नाईक अध्यक्ष होते.
१९४६, ३ जुलै: पं. नेहरू आणि इंग्रज रेसिडेंटच्या आग्रहामुळे कोणतीही अट न लादता ‘स्टेट काँग्रेस’वरील बंदी उठवण्यात आली.
१९४६, १९ जुलै: कंदास्वामी बागेच्या पटांगणात स्टेट काँग्रेसची पहिली जाहीर सभा झाली.
१९४६, १६-१७ ऑगस्ट: विलीनीकरणानंतर ‘स्थायी समिती’ची बैठक झाली, ज्यात स्वामी रामानंद तीर्थ यांची अध्यक्षपदी निवड झाली.
१९४७, ३ जून: लॉर्ड माउंटबॅटन यांनी सत्तांतराचा अहवाल ‘माउंटबॅटन योजना’ म्हणून मांडला.
१९४७, ११ जून: सातव्या निजामाने फर्मान काढून हैदराबाद १५ ऑगस्ट १९४७ पासून सार्वभौम राष्ट्र राहील असे जाहीर केले.
१९४७, १६-१८ जून: हैदराबादच्या चिक्कडपल्ली येथे स्टेट काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले (३०,००० हून अधिक लोक सहभागी झाले, हैदराबाद भारतीय संघराज्यात सामील होण्याचा ठराव मंजूर).
१९४७, ७ ऑगस्ट: स्वामीजींनी ‘विलीनीकरण दिन’ साजरा केला (सुलतान बाजार येथे भारताचा झेंडा फडकावून भारतात विलीन होण्याची शपथ).
१९४७, १५ ऑगस्ट: भारत स्वतंत्र झाला. स्वामीजींना पहाटे अटक झाली, तरीही कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यदिन साजरा केला.
१९४७, ऑगस्टनंतर: स्वामीजींना अटक झाल्यानंतर स्थापन झालेल्या कृतिसमितीला (मुख्यालय मुंबई, नंतर मद्रास) लढ्याचे संचालन व निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले. संस्थानाच्या सीमेबाहेर सशस्त्र कॅम्प उभारले गेले (मनमाड, गदग, विजयवाडा येथे कार्यालये).
१९४७, २९ नोव्हेंबर: भारत व हैदराबादमध्ये ‘जैसे थे’ करार झाला.
१९४८, ३० जानेवारी: स्टेट काँग्रेसच्या आंदोलकांनी मराठवाड्यातील उमरी येथे निजामाची स्टेट बँक लुटली.
१९४८, १३ सप्टेंबर: सकाळी ४ वाजता भारतीय सैन्य हैदराबादमध्ये शिरले (‘ऑपरेशन पोलो’ सुरू).
१९४८, १७ सप्टेंबर: सायंकाळी ५ वाजता निजामाने हैदराबाद रेडिओवरून आपल्या शरणागतीची अधिकृत घोषणा केली. ‘ऑपरेशन पोलो’ अवघ्या १०९ तासात संपले.
१९४८, ३१ डिसेंबर: सैनिकी सरकार समाप्त झाले.
१९४९, ५ एप्रिल: जे. व्ही. पी. समितीने भाषावार प्रांतरचनेविरोधी अहवाल सादर केला.
१९५०, २६ जानेवारी: एम. के. वेल्लोडी हैदराबादचे मुख्यमंत्री झाले, निजाम मीर उस्मान अलीला ‘राज्य प्रमुख’ दर्जा.
१९५०, ९-११ एप्रिल: गोविंदभाईंनी काँग्रेसचा राजीनामा दिला. नांदेड येथे नवीन पक्षाचे धोरण ठरवण्यासाठी बैठक झाली (‘नांदेड जाहीरनामा’ प्रसिद्ध झाला, गोविंदभाईंनी मसुदा तयार केला).
१९५०, जून: नांदेड जाहीरनाम्यानुसार ‘लीग ऑफ सोशलिस्ट वर्कर्स’ आणि ‘मराठवाडा किसान परिषद’ या नव्या संघटना स्थापन झाल्या (गोविंदभाई सरचिटणीस).
१९५२: गोविंदभाईंनी ‘जनता लोकतांत्रिक आघाडी’ (पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट)ची स्थापना केली (गोविंदभाई सरचिटणीस). पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मराठवाड्यातील गोविंदभाईंचे सर्व उमेदवार अपयशी ठरले (अपवाद: बीडमधील बाबासाहेब परांजपे).
१९५२, १२ फेब्रुवारी: हैदराबाद राज्यात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर बी. रामकृष्ण राव मुख्यमंत्री झाले.
१९५२, २९-३१ मे: वसमत येथे लीग ऑफ सोशलिस्ट वर्कर्सचे दुसरे अधिवेशन झाले.
१९५३, नोव्हेंबर: मराठवाड्यात जिल्हावार संयुक्त महाराष्ट्र परिषदांची स्थापना करण्यात आली.
१९५३, १ डिसेंबर: नांदेड येथे झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संमेलनात लोकप्रतिनिधींनी नागपूर करारास पाठिंबा जाहीर केला.
१९५३, १० ऑक्टोबर: केंद्र सरकारने ‘फजल अली समिती’ची नेमणूक केली.
१९५४, जानेवारी: मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या प्रतिनिधींची बैठक झाली, ज्यात संघटनेची पुनर्घटना करण्यात आली. श्री. शंकरराव देव अध्यक्ष झाले आणि गोविंदभाई संयुक्त कार्यवाह झाले.
१९५४, ४ मार्च: गोविंदभाईंनी संयुक्त महाराष्ट्र मराठवाडा विभाग समितीची बैठक बोलावली.
१९५४: लीग ऑफ सोशलिस्ट वर्कर्सचे विसर्जन करण्यात आले. गोविंदभाई पक्षीय राजकारणापासून दूर राहिले.
१९५५: गोविंदभाईंनी मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक मागण्या असलेले निवेदन सादर केले (पूर्णा व पैनगंगा धरणे, रस्ते, शिक्षणसंस्था इत्यादी).
१९५५, ८ नोव्हेंबर: केंद्र सरकारने जनतेचा विरोध डावलून ‘त्रिराज्य योजना’ अमलात आणण्याचा निर्णय घेतला.
१९५६, ६ फेब्रुवारी: पुण्यात टिळक स्मारक मंदिरात केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखालील मेळाव्यात ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ स्थापन करण्याचा निर्णय झाला (एस.एम. जोशी सरचिटणीस).
१९५६, ९ मार्च ते ४ एप्रिल: मुंबई राज्यात १३,००० हून अधिक कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करून कारावास भोगला.
१९५६, मार्च: ‘मराठवाडा विकास मंडळ’ चे पहिले संमेलन झाले (गोविंदभाई संयोजक, बाबासाहेब परांजपे अध्यक्ष).
१९५६, ५ जून: मुख्यमंत्री बी. रामकृष्णराव यांनी औरंगाबाद येथे वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय, परभणीत शेतकी महाविद्यालय इत्यादी सुरू करण्याची घोषणा केली (विद्यापीठाचा निर्णय नाही).
१९५६, ५ ऑगस्ट: दिल्ली येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीत ‘विशाल द्विभाषिक मुंबई राज्या’चा प्रस्ताव संमत झाला.
१९५६, १ नोव्हेंबर: विशाल मुंबई द्विभाषिक राज्य अस्तित्वात आले. यात गुजरात, मुंबई आणि विदर्भासहित महाराष्ट्र समाविष्ट करण्यात आले.
१९५६: हैदराबाद राज्याचे भाषावार त्रिभाजन झाले; मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाला.
१९५७: गोविंदभाई ‘मराठवाडा खादी व ग्रामोद्योग उपसमिती’चे चिटणीस झाले.
१९५८: मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली आणि गोविंदभाईंची पहिल्या सिनेटवर व कार्यकारिणीवर नियुक्ती झाली.
१९६०, १ मे: संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली.
१९६२: गोविंदभाईंनी औरंगाबादमधून मराठवाड्याच्या विकासाच्या मुद्द्यावर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली, परंतु त्यांचा पराभव झाला.
१९६४, १९-२० ऑक्टोबर: औरंगाबादेत ‘मराठवाडा विकास परिषद’ (विनायकराव पाटील आणि शंकरराव चव्हाण यांचा पुढाकार, गोविंदभाई सहभागी).
१९६४, २५-२६ ऑक्टोबर: पुण्यात ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास परिषद’ (गोविंदभाईंनी मागास भागांच्या औद्योगिक विकासाला प्राधान्य देण्याची मागणी केली).
१९६७: ‘मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती’ स्वतंत्रपणे नांदेड येथे स्थापन झाली (गोविंदभाई संस्थापक सदस्य).
१९७०: गोविंदभाईंच्या अध्यक्षतेखाली ‘मराठवाडा जनता विकास परिषद’ स्थापन झाली.
१९७२: परभणीच्या कृषिमहाविद्यालयात मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना असमान वागणूक मिळत असल्याने आंदोलन झाले. गोविंदभाईंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन ‘मराठवाडा कृषिविद्यापीठ’ आंदोलनात रूपांतरित झाले.
१९७३: गोविंदभाई सरस्वती भुवन संस्थेचे अध्यक्ष झाले.
१९७४: परभणी जिल्ह्यातील वसमत येथे सरकारी नोकरभरतीतील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन झाले. ‘मराठवाडा जनता विकास परिषद’ या आंदोलनात सहभागी झाली, गोविंदभाईंनी नेतृत्व केले. गोविंदभाईंनी ‘मराठवाडा बंद’ची हाक दिली, ज्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
१९७४: मनमाड ते मुदखेड रेल्वेमार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाले आणि लातूर–मिरज मार्गाचे रुंदीकरणाचे काम देखील सुरू झाले (गोविंदभाईंच्या रेल्वे रोको आंदोलनामुळे).
१९७५: सरस्वती भुवन संस्थेच्या हीरक महोत्सवात ‘युगानुकूल शिक्षण’ या विषयावर गोविंदभाईंनी चर्चासत्र आयोजित केले.
१९७६: विद्यापीठ कायद्याच्या मसुद्यावर चर्चा घडवून त्यात सुधारणा सुचविण्याचे काम गोविंदभाईंनी केले.
१९८२: गोविंदभाईंच्या सततच्या पाठपुराव्यामुळे औरंगाबादमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन झाले.
१९८२: मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी डॉ. वि. म. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘वैधानिक विकास मंडळे’ स्थापनेवर विचार करण्यासाठी समिती नेमली.
१९९०: मुख्यमंत्री शरद पवार यांच्या सरकारने मंडळाची कमकुवत रचना सुचवली, जी गोविंदभाईंनी नाकारली.
१९९२, २६ जानेवारी: पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी गोविंदभाईंना ‘पद्मविभूषण’ देऊ केले. मराठवाड्याला वैधानिक मंडळ मिळाल्यासच ते स्वीकारणार असल्याचे गोविंदभाईंनी सांगितले. सरकारने तत्त्वतः मान्य केल्यावरच ते त्यांनी स्वीकारले.
१९९२, ९ मार्च: राष्ट्रपतींनी ऐतिहासिक अध्यादेश काढून मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वैधानिक विकास मंडळांची घोषणा केली आणि गोविंदभाईंनी ‘पद्मविभूषण’ स्वीकारले.
२००२, २१ नोव्हेंबर: गोविंदभाई श्रॉफ यांचे निधन झाले.