विकास हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा यासाठी त्याला सामाजिक न्यायाची जोड असली पाहिजे.
विकास हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा यासाठी त्याला सामाजिक न्यायाची जोड असली पाहिजे.
गोविंदभाईंचा मूळ स्वभाव शिक्षकाचा होता. त्यांच्या कार्याची सुरुवातच शिक्षक म्हणून झाली होती. शिक्षणाविषयी त्यांना अपार प्रेम होते. त्यामुळेच ते विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय असत. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्यानंतरही शिक्षणावरील त्यांची निष्ठा अबाधित राहिली. शिक्षण समाजाशी, देशाशी आणि नीतिमूल्यांशी जोडलेले असावे असे ते आवर्जून सांगत. केवळ प्रमाणपत्र देणारे शिक्षण उपयोगाचे नाही. शिक्षणाने व्यक्तीमध्ये प्रगल्भता, शहाणपण आणि उपयोगी कौशल्ये विकसित झाली पाहिजेत. शिक्षणाने वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सत्यशोधनाची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. विज्ञान-तंत्रज्ञान शिकून जर समाजात भोगवाद वाढत असेल, तर ते शिक्षण अपयशी ठरेल. शिक्षणाचे उद्दिष्ट, मानवता, समता, प्रज्ञा आणि करुणा या मानवी मूल्यांच्या विकासावर आधारित असले पाहिजे.
गोविंदभाईंचा सरस्वती भुवन शिक्षणसंस्थेशी संबंध १९३९ पासून आला. गांधीजींच्या आदेशावरून सत्याग्रह स्थगित करण्यात आला. गांधीजींनी कार्यकर्त्यांना विधायक कामात गुंतवून घेण्याचा सल्ला दिला. गोविंदभाई औरंगाबादमध्ये परत आले आणि सरस्वती भुवन शाळेसाठी काम करू लागले. सर्वप्रथम शाळेसाठी नवीन इमारत उभारण्याचा संकल्प त्यांनी केला. पन्नालाल कोठावालांच्या मदतीने शहराजवळची दहा एकर जमीन फक्त तीन हजार रुपयांत खरेदी केली. अर्धवर्तुळाकार इमारतीचा आराखडा तयार करून त्यांनी औरंगाबाद, हैदराबाद, गुजरातमधील दानशूरांकडून निधी मिळवला आणि अल्पावधीत भव्य शाळा उभी केली. यात कर्वे गुरुजी आणि वैशंपायन यांची त्यांना साथ मिळाली.
त्यानंतर काही काळ गोविंदभाईंनी स्वातंत्र्यलढ्याला पूर्ण वेळ दिला. या काळात संस्थेची जबाबदारी स. कृ. वैशंपायन यांच्यावरच होती. निजामी राज्याच्या त्या कठीण काळात संस्था अडचणीत आली असताना वैशंपायन यांनी ती सावरली. १९५५ मध्ये गोविंदभाईंनी सरस्वती भुवनची जबाबदारी पुन्हा स्वीकारली. १९६७ साली ते सरचिटणीस आणि १९७३ पासून अखेरपर्यंत संस्थेचे अध्यक्ष होते.
गोविंदभाई सरस्वती भुवन संस्थेचे सरचिटणीस झाल्यानंतर शाळेच्या इमारतीत एका छोट्याशा कार्यालयात रोज बसत. दररोज सकाळी दहा ते दुपारी दोन आणि संध्याकाळी सहा ते रात्री नऊ अशी नियमित वेळ कार्यालयाला देत. प्रवेश, अभ्यासक्रम, अध्यापन, प्रयोगशाळा, निधी, शिक्षकांचे प्रश्न व शासनाशी व्यवहार इत्यादी संस्थेच्या व्यवहारांवर त्यांचे बारकाईने लक्ष असे. कामकाज सुरळीत चालावे म्हणून त्यांनी काही कठोर नियम लागू केले होते. ते स्वतः देखील या नियमांचे पालन करीत असत. गोविंदभाईंनी संस्थेतील प्रवेशासाठी देणगी स्वीकारण्यास साफ नकार दिला होता. निधीसाठी झोळी घेऊन फिरायला ते तयार होते, पण शाळेच्या प्रवेशात पालकांना अडचणीत आणणे त्यांना मान्य नव्हते.
संस्थेच्या व्यवस्थापनात त्यांनी साधेपणा व काटकसर यांवर भर दिला. त्यांच्या सहकाऱ्यांना हा काटेकोरपणा कधी कंजूषी वाटे, पण सार्वजनिक संस्थांमध्ये अनाठायी खर्च टाळावा, ही त्यांची ठाम धारणा होती. शाळा-महाविद्यालयांच्या अनुदानसंहितेचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. शासकीय अधिकारी, मंत्री यांची भेट घेऊन ते नियमांमध्ये आवश्यक बदल करवून घेत. त्यांच्या नि:स्वार्थी धडपडीकडे पाहून शासकीय अधिकारी त्यांना मनाची वागणूक देत. म्हणूनच सरस्वती भुवन संस्थेची सर्व सरकारी कामे विनाभ्रष्टाचार पार पडत गेली.
गोविंदभाई संस्थेतील शाळा-महाविद्यालयांमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जावे, यासाठी सतत प्रयत्नशील असत. ते शिक्षकांशी संवाद साधत, आणि शिक्षणविषयक चिंतनावर भर देत. १९६३ मध्ये सरस्वती भुवन कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. यातही गोविंदभाईंचे मोठे योगदान होते.
१९७५ साली सरस्वती भुवन संस्थेच्या हीरक महोत्सवात ‘युगानुकूल शिक्षण’ या विषयावर दोन दिवसांचे चर्चासत्र गोविंदभाईंनी आयोजित केले. तीन महिने आधीपासून तयारी करत त्यांनी शिक्षक-प्राध्यापकांना शिक्षणविषयक चिंतनात सहभागी करून घेतले. १९७६ मध्ये विद्यापीठ कायद्याच्या मसुद्यावर चर्चा घडवून त्यात सुधारणा सुचविण्याचे काम गोविंदभाईंनी केले. नंतर अमृतमहोत्सवात अभिनव अध्यापन पद्धती व सहपाठ्यक्रमांचे तीन वर्षांचे नियोजन राबवले. त्यांनी ‘विद्यासमिती’ आणि शिक्षकांसाठी संशोधन सहाय्य करणारे ‘संशोधन प्रतिष्ठान’ही स्थापन केले.
सरस्वती भुवन संस्थेच्या इमारती बांधताना गोविंदभाईंनी काटकसर आणि दर्जा यांचा योग्य समतोल राखला. बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी बारकाईने लक्ष दिले आणि खर्चावर नियंत्रण ठेवले. सिमेंटच्या प्रत्येक थैलीचा हिशोब मागणारी त्यांची कार्यशैली कठोर वाटली, पण ती त्यांनी नेहमीच पाळली. गोविंदभाईंच्या मते, सार्वजनिक संस्थेच्या विश्वस्तांनी जबाबदारीने आणि काटेकोरपणे काम केले पाहिजे. त्यांच्या अशा चिकित्सक वृत्तीमुळेच सरस्वतीभुवन परिसरात अनेक शैक्षणिक आणि सांस्कृतिक इमारती उभ्या राहिल्या.
सरस्वती भुवन संस्थेबरोबरच गोविंदभाई नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते. सेलूच्या नूतन शिक्षणसंस्था व अंबाजोगाईच्या योगेश्वरी संस्थेशीही त्यांचा ऋणानुबंध होता. त्यामुळे मराठवाड्यातील शिक्षण संस्था त्यांच्याशी सतत जोडलेल्या राहिल्या. शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक चळवळींचे केंद्र म्हणून सरस्वती भुवन परिसर ओळखला जाई. गोविंदभाईंमुळे चर्चासत्रे, परिषदा, मोर्चे, नाट्यप्रयोग यासाठी हे ठिकाण सतत सक्रिय राहिले. औरंगाबादच्या चळवळींना येथे अधिष्ठान मिळाले होते.
१९६० च्या शैक्षणिक धोरणातील खासगीकरण, शुल्कवाढ व अनुदान यातील बदलांमुळे गरीब व मध्यमवर्गीय पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला. शिक्षणातील प्रश्नांवर सामूहिक चर्चा व्हावी म्हणून गोविंदभाईंनी १८ डिसेंबर १९६७ रोजी शिक्षणसंस्थांच्या फेडरेशनचे अधिवेशन घेतले. या अधिवेशनाद्वारे गोविंदभाईंनी अनुदान संहितेत योग्य ते बदल घडवून आणले. काही काळ गोविंदभाई त्याचे अध्यक्षही होते.
भारत सरकारच्या संपूर्ण साक्षरता अभियानात औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश होता. महाराष्ट्र शासनाने गोविंदभाईंना या मोहिमेचे मानद अध्यक्ष नेमले. त्यांच्या नेतृत्वामुळे मोहिमेला सेवाभावी, स्वयंसेवी स्वरूप मिळाले आणि अभियानाला विशेष उंची लाभली. गोविंदभाई म्हणत की आज साक्षरतेचे कार्य स्वातंत्र्यलढ्याइतकेच महत्त्वाचे आहे. त्यांच्या प्रेरणेतून अनेक सामाजिक कार्यकर्ते, कलावंत, स्वातंत्र्यसैनिक, निवृत्त व्यक्ती पूर्णवेळ स्वयंसेवक म्हणून या अभियानात सहभागी झाले. शासनाच्या कर्मचाऱ्यांचीही त्यांना साथ लाभली. जिल्ह्यातील लाखो निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठरवून गावागावांत साक्षरता समित्या स्थापन करण्यात आल्या. शहरात वार्ड-समित्या तयार करण्यात आल्या. जिल्ह्यासाठी चाळीस हजार स्वयंसेवक, चार हजार प्रशिक्षक, चारशे कर्मचारी आणि चाळीस प्रधान अधिकारी नेमण्यात आल्या. गोविंदभाईंनी स्वतःला साक्षरतेच्या कार्यात झोकून दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद जिल्ह्याने साक्षरतेचे उद्दिष्ट पूर्णतः साध्य केले.
गोविंदभाई अनेक शिक्षण संस्थांशी संलग्न होते. १९५८ मध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर युनिव्हर्सिटीच्या पहिल्या सिनेटवर व कार्यकारिणीवर त्यांची नियुक्ती झाली होती. मराठवाडा विद्यापीठाच्या कारभारात १९७० पर्यंत त्यांनी योगदान दिले. शिक्षण आणि संशोधन कार्यातील आणखी एक योगदान म्हणजे स्वामी रामानंदतीर्थ स्मारक ट्रस्टची स्थापना. गोविंदभाई स्वामी रामानंद तीर्थ यांना गुरूस्थानी मानत. मनात. स्वामीजींच्या निधनानंतर गोविंदभाईंनी त्यांच्या नावाने स्मारक उभे करण्याचे ठरवले. केवळ पुतळा वा समाधी यावर स्मारकाची संकल्पना थांबवली नाही. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारी संस्था उभारण्याचे काम त्यांनी हाती घेतले. हैदराबाद येथे स्वामी रामानंदतीर्थ स्मारक ट्रस्ट स्थापन करण्यात आला. हैदराबाद, कर्नाटक व महाराष्ट्रातील अनुयायांच्या सहकार्याने एक वास्तू, समाधी, आणि प्रार्थनास्थळ उभारण्यात आले. गोविंदभाई या ट्रस्टचे सरचिटणीस होते तर पी. व्ही. नरसिंहराव अध्यक्ष होते. हैदराबाद संस्थान निजामशाहीतून मुक्त करण्यासाठी आ. कृ. वाघमारे यांनी जे 'मराठवाडा' नियतकालिक काढले आणि पुढे ते दैनिक झाले त्या मराठवाडा ट्रस्ट चे गोविंदभाई दीर्घकाळ अध्यक्ष होते.
या संस्थेच्या माध्यमातून ध्यान, प्रवचन, आणि सामाजिक चर्चासत्रे सुरू झाली. विविध भाषांमधील ग्रंथांचे अनुवाद, एकात्मतेसाठी उपक्रम, विद्यापीठांमध्ये व्याख्यानमाला, आणि हैदराबाद मुक्तिसंग्रामावर ग्रंथप्रकाशन यांसारख्या उपक्रमांनी ट्रस्टची कार्यकक्षा व्यापक केली. औरंगाबाद, हैदराबाद व गुलबर्गा येथे ‘स्वामी रामानंदतीर्थ संशोधन संस्था’ स्थापन झाल्या. त्यात औरंगाबादची संस्था गोविंदभाईंच्या थेट नेतृत्वाखाली काम करत होती. सेवाभावी आणि सामाजिक जाण असलेल्या लोकांकडून ते संशोधनाचे काम करून घेत. त्यांच्या मते विद्यापीठाच्या चौकटीतील संशोधन अनेकदा उपयोजनशून्य असते. त्यामुळे त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून संशोधन संस्था चालवली. शेती, ग्रामोद्योग, शैक्षणिक दर्जा, सामाजिक प्रश्न अशा विषयांवर संस्थेने उपयुक्त संशोधन केले. मराठवाड्यातील त्यांचा उच्च माध्यमिक शिक्षणावरील अभ्यासक्रम विशेषत्वाने महत्त्वाचा ठरला.
गोविंदभाईंच्या मते स्वामीजींच्या स्मृतीला खरे स्मारक म्हणजे त्यांनी पाहिलेले प्रगत, साक्षर, समतावादी मराठवाडा घडवणे होय — आणि तेच कार्य या संस्थेमार्फत त्यांनी पुढे चालू ठेवले.