विकास हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा यासाठी त्याला सामाजिक न्यायाची जोड असली पाहिजे.
विकास हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा यासाठी त्याला सामाजिक न्यायाची जोड असली पाहिजे.
गोविंदभाई हे हाडाचे देशभक्त आणि समाजसेवक होते. व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून तरुण वयात त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली आणि स्वातंत्रोत्तर काळात निरपेक्ष वृत्तीने लोकांसाठी काम केले. सत्तेची पदे नाकारून त्यांनी मागासलेल्या मराठवाड्यासाठी काम करण्याचे खडतर व्रत स्वीकारले. ते बुद्धिमान तसेच त्यागी होते. त्यांची प्रत्येक कृती ज्ञान आणि विवेक यावर आधारित असे. स्वतः विद्वत्तापूर्ण असूनही ते ‘अहंकारी बुद्धिजीवी’ नव्हते. सामान्य लोकांशी असलेली आपली नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही.
सार्वजनिक जीवनात ते ‘अजातशत्रू’ होते. त्यांचे वागणे बाहेरून पाहता कधी कधी कर्मठ, कठोर आणि रुक्ष वाटत असे. त्यामुळे काही लोक त्यांच्याशी बोलायला संकोचत. पण प्रत्यक्षात ते अतिशय संवेदनशील स्वभावाचे होते. एखाद्या मुद्द्यावर वाद घातल्यानंतरही, समोरच्याच्या बोलण्यात तथ्य वाटले तर ते निःसंकोचपणे आपली मते बदलत. ते अनेकदा विनोद करत आणि मनमोकळेपणाने हसत. आपल्या गतकाळातील गमतीशीर प्रसंग ते मोकळेपणाने आणि रंगतदार शैलीत सांगत.
स्वातंत्र्यानंतरच्या पंचावन्न वर्षांत गोविंदभाईंच्या कार्याचा विस्तार सरस्वती भुवन संस्था, नांदेड एज्युकेशन सोसायटी, स्वामी रामानंदतीर्थ संशोधन संस्था, मराठवाडा जनता विकास परिषद, खादी समिती अशा अनेक संस्थांमधून झाला. या संस्था त्यांनी लोकांच्या सहभागावर उभ्या केल्या आणि अथक परिश्रमांतून घडवून आणल्या. मात्र त्यांनी कधीही कोणत्याही संस्थेवर मालकीहक्क सांगितला नाही. त्यांची भूमिका नेहमी विश्वस्ताचीच राहिली.
त्यांची राहणी अतिशय साधी होती आणि गरजा अत्यंत माफक होत्या. धोतर, सदरा, करड्या रंगाचा जाड कोट आणि डोक्यावर थोडीशी तिरकी बसलेली गांधी टोपी असा त्यांचा अतिशय साधा वेश असे. कोणत्याही कार्यक्रमाला किंवा भेटीला जाताना त्यांच्या हातात नेहमी कागदपत्रांनी भरलेली एक पिशवी असे. दररोज सकाळी दहा ते दुपारी दोन आणि संध्याकाळी सहा ते रात्री नऊ अशी नियमित वेळ ते आपल्या कार्याला देत. वैयक्तिक जीवनात तसेच सार्वजनिक कार्यात अनावश्यक खर्चाला त्यांनी नेहमीच विरोध केला. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते व्रतस्थपणे जगले.
आजी, आई, आत्या, मोठी बहीण, गोविंदभाई आणि धाकटा भाऊ असे त्यांचे एकत्र कुटुंब होते. कुटुंबाचा आणि गोविंदभाईंचा सांभाळ करणाऱ्या त्यांच्या आजीचा मृत्यू १९३७ मध्ये, तर आईचा मृत्यू १९५५ मध्ये झाला. गोविंदभाईंचा विवाह सत्याबेन यांच्याशी १९३७ मध्ये झाला. लग्नानंतर सत्याबेन यांनी पुढील तीन ते चार वर्षे आग्रा येथील मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन डॉक्टरीची पदवी मिळवली. स्वातंत्र्यलढ्यात आणि त्यानंतर संसारात त्यांनी गोविंदभाईंना अखंड साथ दिली. सार्वजनिक कार्यात व्यस्त असल्याने गोविंदभाईंना कुटुंबासाठी जास्त वेळ देता आला नाही. परंतु त्यांनी कधीही तक्रार केली नाही. ‘कार्यकर्ते हाच आपला परिवार’ या गोविंदभाईंच्या सूत्राला त्यांनी साथ दिली. सत्याबेन यांना व्हायोलिन वाजवण्याचा छंद होता. गोविंदभाई देखील सत्याबेन यांना त्यासाठी प्रोत्साहन देत. घराच्या जबाबदारीबरोबरच त्यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय कधीही सोडला नाही.
श्रॉफ दाम्पत्याला तीन मुलगे – डॉ. अजित, आणि डॉ. संजीव आणि राजीव. मुलांच्या संगोपनाची जबाबदारी मुख्यत्वे सत्याबेन यांनीच पेलली. परंतु मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारी दोघांनी उचलली. तीनही मुलांची गोविंदभाईंवर नितांत श्रद्धा होती.
सर्वात मोठे अजित श्रॉफ व्यवसायाने डॉक्टर होते. ते औरंगाबाद मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यांची पत्नी उषा श्रॉफ या देखील व्यवसायाने डॉक्टर होत्या. त्यांनी आपल्या सासूचा दवाखाना पुढे चालविला. अजित यांचा मुलगा गौतम हा देखील डॉक्टर झाला. त्याचा विवाह रूपल यांच्याशी झाला. त्यांनी देखील आपल्या आजे सासूबाईंचा दवाखाना चालवण्यात मदत केली. गोविंदभाईंचे दुसरे पुत्र संजीव यांचा विवाह सुरिया यांच्याशी झाला. चिरंजीव संजीव आणि बंधू गोपालदास अमेरिकेमध्ये स्थायिक झाले. धाकट्या राजीवने मात्र अनेक वर्षे आजारात काढली. त्याच्या आजाराचे गोविंदभाईंना अतिशय दुःख होते. फई (आत्या), आक्का (बहीण) यांचा मृत्यू देखील गोविंदभाईंना पाहावा लागला. त्यांच्यासारखी स्थितप्रज्ञ व्यक्ती देखील त्यावेळी खचून गेली होती.
आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात प्रकृती साथ देत नसतानाही वयाची एक्क्याण्णव वर्षे उलटून गेल्यावरही ते गावोगाव फिरत असत. त्यांचे मन आणि बुद्धी तितकीच तल्लख आणि कार्यक्षम राहिली होती. गोविंदभाईंचा आशावाद अत्यंत दुर्दम्य होता. शरीर थकलेले असले, तरी त्यांची कार्यक्षमता, सतत प्रवास, साधे जीवन, अभ्यास आणि अहोरात्र कामाची वृत्ती कायम होती. त्यांच्याबरोबर असलेले तरुण कार्यकर्तेही या वेगाला थकत असत. वयपरत्वे आलेली अशक्तता आणि व्याधी यांची तमा न बाळगता ते शेवटपर्यंत सक्रिय राहिले.
गोविंदभाईंवर १९९१ मध्ये, वयाच्या ८० व्या वर्षी, हृदयातील ब्लॉकेजसाठी उपचार करण्यात आले आणि त्याच वेळी पेसमेकर बसवण्यात आला. तरीही ते सतत कार्यमग्न राहत. अखेर २१ नोव्हेंबर २००२ रोजी काम करत असतानाच गोविंदभाईंना मृत्यूने गाठले. महाराष्ट्र एका स्वातंत्र्यसैनिकाला, समाजवादी नेत्याला, विकास पुरुषाला आणि मराठवाड्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या नेत्याला मुकला.