विकास हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा यासाठी त्याला सामाजिक न्यायाची जोड असली पाहिजे.
विकास हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवा यासाठी त्याला सामाजिक न्यायाची जोड असली पाहिजे.
भारत सरकारने २६ जानेवारी १९९२ रोजी गोविंदभाईंना पद्मविभूषण देऊन सन्मानित केले. त्याचवेळी गोविंदभाईंचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. गोविंदभाईंच्या सहकाऱ्यांच्या आठवणींवर आधारित लेखांचे संकलन करून गौरवग्रंथ तयार करण्यासाठी औरंगाबाद येथे एक समिती नेमण्यात आली. या ग्रंथाच्या प्रमुख संपादकपदाची जबाबदारी दिनकर बोरीकर यांच्याकडे सोपवण्यात आली. गोविंदभाईंबद्दलचे अनुभव लिहावेत, त्यांची जाणवलेली वैशिष्ट्ये व्यक्त करावीत, अशा स्वरूपाची विनंती समाजातील विविध स्तरांतील व्यक्तींना करण्यात आली. मिळालेल्या लेखांचे संकलन करून हा ग्रंथ सिद्ध करण्यात आला. या ग्रंथातून गोविंदभाई वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून कसे दिसतात, याची कल्पना वाचकांना येते. गौरवग्रंथातील काही महत्त्वपूर्ण संदर्भ येथे दिले आहेत.
शंकरराव चव्हाण
हैदराबाद राज्यात सरदार वल्लभभाईंनी पोलिस ऍक्शन घेतली नसती तर हैदराबाद राज्याचे भारतातील विलीनीकरण लवकर झाले नसते हे जरी खरे असले तरी गोविंदभाई श्रॉफ, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली जो मुक्तिसंग्राम झाला त्यानेही ऐतिहासिक कामगिरी बजावली हे विसरून चालणार नाही. लढ्याला राजकीय स्वरूप देणे, त्याला हिंदू-मुस्लिम संघर्ष असे जातीयवादी स्वरूप येऊ न देणे आणि त्याचबरोबर हैदराबाद राज्य भारतात विलीन झाल्यानंतर सामाजिक निर्मितीचा आशय काय असावा या सर्व गोष्टींवर गोविंदभाईनी आपला ठसा उमटवला आहे.
मराठवाड्याच्या विकासासाठी गोविंदभाईंनी सत्तेशी अनेक वेळा संघर्ष केले. त्या वेळी मी सत्तेत होतो. त्यातून लोकमानसांत अशी प्रतिमा उभी करण्याचा काहींनी जरूर प्रयत्न केला असेल, की मी गोविंदभाईंचा दुःस्वास करतो, त्यांच्याविषयी मला मुळीच आस्था नाही. मात्र हा समज निखालस खोटा आहे. मराठवाडा मागासलेला आहे, विभागीय असमतोलाचा तो बळी आहे याबद्दल माझे आणि गोविंदभाईंचे मतभेद असण्याचे कारण नाही.
गोविंदभाईंसारखी व्यक्ती मराठवाड्यात जन्मली, मराठवाड्यातच रमली, मराठवाड्याच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहिली, हे खरोखरच मराठवाडा विभागाचे भाग्य मानले पाहिजे. मराठवाड्याच्या विविध प्रश्नांचा मूलभूत अभ्यास करून सरकारकडे आपली बाजू मांडणे आणि या प्रश्नांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करणे यांत गोविंदभाईंनी बहुमोलाचे काम केले आहे. मी तर असे म्हणेन की, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणारे श्री. गोविंदभाई श्रॉफ हे ‘Last of the Romans’ आहेत.
दिनकर बोरीकर
गोविंदभाई शॉफ यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांत मूलगामी चिंतन केले आणि त्या चिंतनाला अनुषंगून आणि पूरक अशी कृती केली. ही कृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवून तिला सामूहिक जनशक्तीचे बळ प्राप्त करून देण्याचा कसोशीने प्रयत्न केला. चिंतनाला कृतीची जोड आणि कृतीला चिंतनाची बैठक अशा पद्धतीने गोविंदभाई कार्य करीत आले. मराठवाड्याची नवी पिढी गोविंदभाईंच्या विचार आणि कार्याची निश्चितच वारस झाली पाहिजे.
धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समता आणि विभागीय असमतोल या प्रश्नांचे गोविंदभाईंनी घेतलेले संदर्भ स्थानिक असले तरी त्यांनी केलेले चिंतन आणि त्यावर सूचविलेले उपाय हे विवेकाधिष्ठित आणि संतुलित आहेत हेच गोविंदभाईंच्या व्यक्ती, विचार आणि कार्य यांचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकाला जाणवेल.
अनंत भालेराव
गोविंदभाईंना मराठवाड्याच्या प्रश्नांनी पछाडले होते. त्यांच्या जीवनपद्धतीची तुलना करायची झाली तर ऋतूचक्राशीच करता येईल. विश्वात कसलीही उलथापालथ होवो, ऋतूंचे क्रम काही बदलत नाहीत. तसे भाईंचे आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून आजतागायत त्यांनी मागास भाग म्हणून मराठवाड्याच्या प्रश्नांचा पिच्छा केला. प्रश्नांचा साकल्याने विचार करायचा, आपली बाजू पटवून देता यावी म्हणून आवश्यक ती आकडेवारी गोळा करायची, लोकशाही पद्धतीने सर्व युक्तिवादांची वस्तुनिष्ठ मांडणी करायची व संसदीय पद्धती सांभाळून प्रश्नांची सर्व पातळ्यांवर तड लावायची. हे सर्व करून झाले आणि अगदीच अनिवार्य झाले तर लोकशक्तीला कौल लावायचा. हे सर्व करण्यात त्यांनी आपली हयात वेचली. त्यांच्या अभ्यासाची व संसदीय चौकटीत राहून कर्तव्य पार पाडण्याची हातोटी व लायकी त्यांनी सिद्ध केली आहे.
त्यांची एकूण प्रकृती फार आत्मकेंद्री आहे. दुरून व बाह्यतः ते लोकांना अत्यंत रुक्ष व अरसिक वाटतात. परंतु त्यांनी एके काळी चांगले चित्रपट आवर्जून बघितले आहेत. सत्याबेन पूर्वी व्हायोलिन फार चांगले वाजवीत असत व भाईही सवड काढून ते ऐकत व दाद देत असत. चांगले गाणे, चांगले चित्र, चांगले शिल्प आणि चांगले साहित्य त्यांनाही भुरळ पाडते. त्यांना जीवनात भरपूर रस आहे. जीवनात जे काही चांगले, भव्य दिव्य असेल ते त्यांनाही मोहित करते. ते स्वतः विज्ञानाचे फार चांगले विद्यार्थी होते व अजूनही विज्ञान हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. भाईंच्या दृष्टीने जे विज्ञान मानवी जीवन आनंदी, सुखी आणि समृद्ध करीत नाही ते विज्ञानच नव्हे. त्यांना अध्यात्म वगैरेचे फार वावडे आहे. तसे ते पक्के भौतिकवादी परंतु ज्ञानाचे आणि विज्ञानाचे त्यांना जे काही दर्शन घडते ते आनंदमयच आहे.
सरदार वल्लभभाई पटेल मृत्यूपूर्वी औरंगाबादी आले होते. तेव्हा ते उपपंतप्रधान व गृहमंत्री होते. त्यांनी या मुक्कामात फक्त एका व्यक्तीची भेट घेतली आणि ती व्यक्ती होती गोविंदभाई. सरदारांबद्दल भाईंना नितांत आदर होता. त्यांच्याशी मतभेदही तेवढेच तीव्र होते. हैदराबाद स्टेट काँग्रेसमधील मतभेद विकोपाला गेले होते व भाई स्वतः एका गटाचे तेव्हा म्होरके होते. सुमारे तास-दीड तास ही भेट झाली. भेटीत काय चर्चा झाली हे भाई कधी सांगत नाहीत. सरदारांनी भाईंना वडीलकीच्या नात्याने तडजोड करण्यासाठी समजावून सांगितले. निष्ठेची प्रतारणा त्यांच्याकडून होण्याची सुतराम शक्यता नव्हती. सत्ता लाथाडणारा हा माणूस बघून सरदारांना मनोमनी बरेच वाटले असेल. कल्पना नसताना त्यांना एक मार्क्सवादी तुकाराम भेटला होता.
पुरुषोत्तम चपळगावकर
जुन्या हैदराबाद संस्थानात आणि विशेषतः मराठवाड्यात जनतेचे राजकीय जीवन समृध्द व्हावे व शैक्षणिक क्षेत्रात मराठवाड्यातील जनतेला शिक्षणाचा लाभ व्हावा यासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पित केले, त्यांत औरंगाबादचे श्री. गोविंददास श्रॉफ हे अग्रगण्य व्यक्तींपैकी एक होत.
लोकांना राजकीय ज्ञान घडवून राजकीय क्षेत्रातील विचारप्रवाहांतील फरक लोकांना समजावे, याकरिता त्यांनी विद्यार्थ्यांचे अभ्यासवर्ग घेतले. कम्युनिझमचा त्यांचा अभ्यास गाढा होता. तसेच गांधीवादी थोर लोकांशीही त्यांचा जवळचा संबंध आला होता. दोन्ही विचारसरणींचा अभ्यास केल्या कारणाने श्री. गोविंदभाईच्या विचारांत कट्टरपणा येणे शक्यच नव्हते.
गोविंदभाईची वैचारिक झेप मोठी. समाजवादाचे जबरदस्त आकर्षण. समाजातील आर्थिक प्रगती राजकारणातून अत्यंत वेगाने करण्याच्या त्यांच्या कल्पना; आणि चळवळीतील प्रत्येक गोष्ट सत्य व न्याय यावरच आधारित असावी, वागणुकीत प्रत्येक ठिकाणी शुध्दता असावी असे त्यांना वाटे. समाजहित सदैव त्यांच्या डोळ्यांपुढे असते. श्री. गोविंदभाई मनाने निर्मळ, वृत्तीने सोज्वळ आणि व्यक्तिशः कोणाशीही विरोध न करणारे असे आहेत. त्यांच्या सहवासात एक वेगळाच आनंद अनुभवास येतो. गोविंदभाईंसारख्या थोर समाजसेवकाला समाजसेवेकरिता सुखी दीर्घायुष्य लाभावे हीच इच्छा.
आशाताई वाघमारे
ज्यांना जीवन कळले व ज्यांचे मीपण सहजपणाने गळून पडले अशा गोविंदभाईंना मी ६० वर्षांपासून बघते आहे. जसजशी वर्षे लोटत गेली तसतसे भाई उमगत गेले व त्यांच्याविषयीचा स्नेहादर वाढत गेला. वर्षामागे वर्षे लोटत गेली आणि मराठवाड्यात भाईंच्या भोवती विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांचा व हितचिंतकांचा एक भला थोरला परिवारच तयार झाला.
सकृद्दर्शनी भाई एक निरस, तेवढ्यास तेवढे, कमी बोलणारे, हास्य-विनोदाचे वावडे असणारे अरसिक गृहस्थ आहेत असे दिसते, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. भाई, वाघमारे, वाळुजकर, कर्वे गुरुजी वगैरे टोळके जमले म्हणजे हास्य-विनोदाला जणू ऊत येत असे. वाङमयीन चर्चाही दिलखुलासपणे चालत. एखादा चांगला चित्रपट बघण्यात आला तर त्यावर तपशीलाने चर्चा होई. जीवनाच्या कोणत्याच क्षेत्राचे येथे कोणाला वावडे नव्हते.
एरवी भावनाशून्य वाटणारा हा माणूस प्रसंगी अत्यंत मृदू मनाचा व कमालीचा भावनाप्रधान वाटत गेला. व्यक्ती लहान असो की मोठी तिला आपला त्रास होता कामा नये. इतकेच नव्हे तर तिचे जे काही न्याय्य हक्क असतील ते तिला मिळालेच पाहिजेत यावर त्यांचा सदैव कटाक्ष राहत आला.
एक प्रसंग केवळ आठवतोच असे नाही तर माझ्या मनाला अजून वेदना देतो. भाईंच्या घरी त्यांची आजी व त्यांची आत्या या दोन म्हाताऱ्या होत्या. आत्याला घरात सर्व फई म्हणत असत. फईचे वय झाले. त्या आजारी पडल्या. त्यांची सर्व सेवाशुश्रूषा गोविंदभाईंनी स्वतः केली. शेवटी फई गेल्या. त्या दिवशी मी भाईंना एखाद्या लहान मुलासारखे स्फुंदून स्फुंदून रडताना बघितले.
वि. पा. देऊळगावकर
गेल्या पन्नास वर्षांपासून मराठवाड्याच्या जनतेचे प्रेरणास्तोत्र प्रेरक शक्ती असलेली ही व्यक्ती, - दिसायला अगदी साधी. थोडा उंचेला बांधा, विशिष्ट पध्दतीने नेसलेले जाडे भरडे खादीचे धोतर, काष्टा अर्धा सोडलेला, पुढचा सोगाही अर्धवट खोवलेला, कॉलरच्या खादीच्या हाफ शर्टच्या बाह्या कोपऱ्याच्या थोड्या खाली उतरलेल्या. त्या शर्टवर मध्ययुगीन फॅशनचा डबल ब्रेस्टशी नाते सांगणारा तपकिरी किंवा तांबुस रंगाचा खादीचा कोट. त्या कोटाच्या गुंड्या लावण्याचा कधी प्रश्नच नसतो. डोक्यावर कशीबशी ठेवलेली खादीची टोपी. पायांत साध्या ग्रामोद्योगी वहाणा. हातात फाइली व पत्रांनी भरलेली एक कातडी बॅग धरून किंचित पाठीत वाकून झपाझपा पावले टाकीत नियमितपणे सरस्वती भुवनकडे जाणारी एक व्यक्ती म्हणजे गोविंदभाई श्रॉफ.
गोविंदभाईंच्या संघटन कौशल्याचा व चिकाटीचा एक आगळाच प्रत्यय मराठवाड्याच्या जनतेला आला. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर असे दोन कालखंड कल्पिले तर पहिल्या कालखंडात प्रबोधन व जनजागृतीच्या कार्यात, जनआंदोलनाचे नेतृत्व करण्यात त्यांनी जी तळमळ व चिकाटी दाखविली, तितकीच तळमळ ते मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाच्या कार्यात दाखवीत आहेत. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये सर्वसामान्यपणे हे दृश्य दिसून येते की राजकारण म्हणजे आमदार होणे, खासदार होणे किंवा अन्य सत्तास्थानांच्या सारखे मागे लागणे. सत्ता राबविण्याव्यतिरिक्त हे अशा सत्तापिपासू लोकांच्या गावीही नसते. सत्ता नसतानाही जनहितासाठी कसे झटावे याचा वस्तुपाठच गोविंदभाईंनी घालून दिला आहे.
सरस्वती भुवन संस्थेची आज जी नेत्रदीपक प्रगती दिसत आहे, तिचे श्रेय गोविंदभाईच्या प्रयत्नांनाच द्यावे लागेल. पू. स्वामी रामानंद तीर्थ स्मारक समितीचे तर ते चिटणीस आहेत. स्वामी रामानंद तीर्थ स्मारक समितीचे विकेंद्रीकरण करून गोविंदभाईंनी मराठवाड्यासाठी एक निराळीच समिती स्थापन केली आहे. एखाद्या व्यक्तीचे स्मारक म्हटले की सामान्य लोक विचार करतात तो त्या व्यक्तीचा पुतळा उभा करण्याचा. गोविंदभाईंनी पुतळा उभा करण्यास पहिल्याच बैठकीत विरोध केला. त्यांनी ‘स्वामी रामानंद तीर्थ स्मारक संशोधन संस्था’ औरंगाबाद येथे स्थापून शैक्षणिक क्षेत्रातील समस्यांवर काही संशोधन करून आपले अहवाल प्रसिध्द केले आहेत. ते अभ्यासकाला तसेच शासनाला सुध्दा फार उपयुक्त आहेत. याशिवाय कितीतरी समाजसेवी संस्थांच्या कार्याची धुरा ते सांभाळीत आहेत. मग बाबा आमट्यांचे कुष्ठरोग्यांच्या सेवेचे असो का मराठवाडा खादी समितीचे असो. पू. विनोबांच्या भूदान कार्यातही ते सहभागी झाले होते.
गोविंदभाई ही एक प्रचंड शक्ती आहे. हातात कुठलीच सत्ता नसलेली पण सत्तेवर अंकुश ठेवणारी, सत्तेला नमविणारी शक्ती आहे.